वैजापुरातील नवजीवन कॉलनीत सार्वजनिक हळदी - कुंकू उत्साहात

Foto
वैजापूर, (प्रतिनिधी): वैजापूर येथील सिंध हॉटेलच्या पाठी मागे असलेल्या नवजीवन कॉलनीत महिलांनी सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. मंगळवारी (दि. २०) रोजी) एका अनोख्या पध्दतीने मकर संक्रांती साजरी केली. 

मकरसंक्रांती म्हटले की, महिलांचा जिव्हाळ्याचा विषय येतो. संक्रांतीनिमित्त महिला आपल्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवत वाण म्हणून एकमेकींना भेटवस्तू देतात. मात्र वैजापूर येथील महिलांनी या पारंपारिक पद्धतीमध्ये थोडा बदल करत कॉलनीतील सर्व महिला एकत्र येत सार्वजनिक हळदी कुंकू कार्यक्रमाची सुरवात केली या निमित्त जवळपास पाचशे महिलांनी कार्यक्रमात उपस्थित राहुन सहभाग घेतला.

विशेष म्हणजे केवळ हळदी कुंकू कार्यक्रम न ठेवता सदर कार्यक्रमाअंतर्गत विविध सामाजिक संदेशाची वाणाच्या रूपात देवाणघेवाण सुध्दा केली. हळदी-कुंकू हा सुवासिनींचा पारंपरिक सण असून हळद आणि कुंकू सौभाग्य, शक्ती आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते.

या निमित्ताने महिला एकमेकींना हळद कुंकू लावून परस्पर सन्मान व्यक्त करतात. एकमेकांमधील स्त्री तत्त्वाचा आणि देवी तत्त्वाचा आदर करण्याची ही सुंदर परंपरा आहे. पूर्वीच्या काळी महिलांना सामाजिक सहभागाच्या संधी मर्यादित असताना हळदी कुंकू हे महिलांसाठी संवाद, आपुलकी आणि विचारांची देवाणघेवाण करण्याचे हक्काचे व्यासपीठ ठरत असल्याने तिळगुळ घ्या आणि गोड बोला या संदेशातून जुने मतभेद विसरून नाती अधिक दृढ केली जातात. 

या वेळी वाण देण्याची परंपराही जपण्यात आली. वाण म्हणजे केवळ भेटवस्तू नसून दान, सद्भावना आणि समृद्धीचे प्रतीक असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शामाबाई राजपूत, दिपाली वर्मा, पल्लवी जोशी, मंजुषा जोशी, श्रुती टेके, निता जानराव, उज्वला पठाडे, कमल कांबळे, रोशनी शेलार, श्रद्धा शेलार, आरती शेलार, मंदा कुमावत, अनिता पडवळे, नंदा कुमावत, शुभांगी साळुंके, रोशनी वेताळ, कविता हिरण, चैताली वेताळ, सुनिता कुमावत, पल्लवी खांडगौरे, माया पगारे, रुपाली बोरावके, अनिता रोठे, कदम, बाप्ते, आदींनी प्रयत्न केले